आज देवाचाही दिवस चांगला जात होता असावा. आला आपला देवाजीच्या मना-सगळ्यांचाच दिस सुंदर करावा..केलान त्याने !
सकाळी शेजारच्या मंदिरातल्या घंटानादाने जाग आली. अन मग अतिशय शांत-गार वातावरणातून उठलेले ते आरतीचे धीरगंभीर सूर. वाटलं ऐकतच राहावं. खूप हलकं वाटलं..खूप आश्वस्त. आईच्या कुशीत वाटतं तसं.
दिवस ढगाळच होता आजचा.पण निराशेची सावली नसणारा. फार फार माया लावणारी सावली होती ती. सकाळी प्रसन्न हवेची झुळूक कुरवाळून गेली आणि दुपारी उन्हानं घेतलं कवेत..अलगद. ते उन्हं बालपणात घेऊन गेलं मला. शाळकरी वयात मे महिन्याची पाहिलेली वाट.. त्या रणरणत्या उन्हाचं अगदी दिलखुलास हुंदडत केलेलं स्वागत.. उन्हात रापलेला चेहरा...निथळत्या घामात तसाच अधाशीपणे रिकामा केलेला रसनाचा मोठ्ठा पेला..आम्हा पोरांवर गारुड करणारी मटका-कुल्फीच्या घंटागाडीची घण-घण..अंगणभर वाळवलेले कुरड्या-पापड..मधेच उठलेली वावटळ..उडणारे पापड पकडण्यासाठी ती वेडी धावपळ..शुभ्र पापडावर जमा झालेली ती चुकार धूळ-अन त्यामुळेच त्याचं नजर रोखून धरणारं सौंदर्य... तेव्हा कळालं नाही मला...पण खूप खोलवर नातं जडलं माझं उन्हाशी.
खूप दंगा केला कि आजी म्हणायची वैतागून.."उन्हात घर बांधेन तुझा"..पण खरं तर उन्हानेच घर केलं माझ्या मनात..माझ्याही नकळत. आता आठवलं कि वेगळंच वाटतं ते जग.. जादुई, सुखी, मनस्वी, निर्धास्त जग ! झाडांची रम्य सळसळ ऐकू यायची तेव्हा.. बालिश-अवखळ सळसळ.. हळूहळू तरुण झाली ती सळसळ..स्वप्नील झाली..एका छोट्या काळासाठी फार समाधान देणारी सळसळ आता टोचत राहते निरंतर..पण अंतर नाही द्यावंसं वाटत तिला. कोण जाणे, ह्याच सळसळीत मंद-लयबद्ध श्वासांची बासरी पुन्हा वाजेल ! कोण जाणे, त्या झाडांची अन श्वासांची एकरूप झालेली सळसळ पुन्हा जाणवेल माझ्या केसात...कोण जाणे !
हे उन म्हणजे सखा आहे माझा ! किती रंगवून टाकतो तो माझा जग, माझा भोवताल. अनंत रंगांची असंख्य फुलं. मनमोकळेपणी स्वत:चं रूप उलगडणारी, नुकत्याच वयात आलेल्या तरुणीप्रमाणे स्वत:त रमलेली. नखशिखांत सजून आपल्याकडे आकृष्ट करणारा तो गुलमोहारी सडा. उन्हाशी स्पर्धा करणारा पिवळाधम्म पलाश.. सूर्याला खुळं आव्हान देणारा.."तू जास्त तेजस्वी कि मी".. एरवी नाला वाटणाऱ्या नदीत पडणारी लख्ख-रुबाबदार सूर्य-किरणं..त्या नाल्यासही सुवर्णवर्खी बनवणारी किमयाच ती..
...आणि तो साक्षात तेजो-निधी !! किती सुंदर! किती तेजस्वी ! प्रकाश उधळताना गरीब-श्रीमंत भेद न करणारा. उब अथवा झळा - सर्वांच्या झोळीत समान माप टाकणारा..
खूप रुंजी घालत होता हे उन गेल्या काही दिवसांपासून..शेवटी आज गळाभेट झाली - काही आठवांशी, काही भावनांशी, कधीही संपू किंवा हरवू न शकणाऱ्या माझ्या सुखाशी !
बरं वाटला आज उन्हाला भेटून. खरं तर बरं वाटलं आज स्वत:लाच भेटून. स्वत:चाच हसरा समाधानी अन निरागस चेहरा आठवणींतून बघून..
बरं वाटत हे उमगून कि हे पृथ्वी-मोलाचं समाधान आवाक्या बाहेर नाही अजून ! ते आहे अजून इथेच !! मनात माझ्या...
:) nice nice nice. good luck!
ReplyDeletebouncer........
ReplyDeletepan im sure khupach bhari ahe!!!!!!
:)
wah mastcha
ReplyDeletenice:-)
ReplyDelete