Saturday, March 26, 2011

मौनखेळ

हृदयी तव ठेउनी माथा, हलकेच मी विसावता,
भिनली हि नीज नयनी, शांत झाली आर्तता !

अवचित मग जाग येता, तुझ्या हृदय-स्पंदनी,
मिटले नेत्र जाणती रे, व्यथा ज्या तुझ्या मनी !

मिठी तुझी का घट्ट झाली, हालता मी उगा जरी,
जाईन मी कुठे कशाला, स्वर्ग-सुख ते तुझ्या उरी !

वाटे साद घाली मज रातराणीचा सुगंध
का सुवास हा तव तनुचा, नशीला अन मंद-धुंद !

बघ कसे बिलगून जाती, मोरपंखी लुब्ध वारे,
कि श्वास हे तुझेच सखया, केसांतून मम सळसळणारे  !

राहू दे एकांत आपुला, शांत-सुंदर अन स्तब्ध !
मौन हे राहू दे उशाशी, नको बोलबाला अन शब्द !

चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपला
पहाटराणी अल्लड आली, मौनखेळ हा संपला !!
 

1 comment:

  1. " मिठी तुझी का घट्ट झाली, हालता मी उगा जरी,
    जाईन मी कुठे कशाला, स्वर्ग-सुख ते तुझ्या उरी ! "
    AWESOME..... :)

    ReplyDelete