Sunday, March 27, 2011

आसवं

ठसठसणारं शरीर अन ठसठसणारं मन. शरीर तसं समजूतदार. गुमान पडीक राहतं एखाद्या कोपर्यात. मनाचं तसं नाही. त्याला गप्प बसणंच मुळी ठाऊक नाही. ते हेलकावे खातं, उलट सुलट गिरक्या घेतं. थकेपर्यंत..थकल्यावरही ते थांबत असं नाही. पण मग गिरक्यांचा वेग पेलवत नाही त्याला. ढेपाळून उदास होऊन जातं. विचारांचा-भावनांचा अविरत मारा सोसत नाही त्याला आणि मग भरून येत मन. ओसंडून जायला होतं डोळ्यांमधून. पण निचरा सहज होत नाही असा.  पापण्यांच्या कडेलाच थबकून राहतात आसव.. का कोण जाणे !? नंतर-नंतर मनाचा भार त्यांना सहन होत नाही अन एखादा चुकार अश्रू गळून पडतो मुकाट. जाताना मणा-मणाचं ओझ हलकं करून जातो. वस्तुमान-आकारमानात नगण्य असणारा तो खाऱ्या पाण्याचा एक चिमुकला थेंब ! पण फार अवघड अवजड चिंता, काळज्या, सल वाहून नेऊन धुवून टाकण्याचं विलक्षण सामर्थ्य असतं त्या एका आसवात !

1 comment: